विवळवेढे उड्डाणपुलावर ट्रक पलटी

| पालघर | प्रतिनिधी |

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे उड्डाणपुलावर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास लाकडी फळ्या वाहून नेणारा ट्रक उलटला. ट्रक पुलाच्या कठड्याला अडकला असून त्यामधील लाकडी फळ्या पुलावरून खाली सेवा रस्त्यावर कोसळल्या. सुदैवाने यावेळी सेवा रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातकडून मुंबई दिशेला निघालेला हा ट्रक विवळवेढे उड्डाणपुलावरून प्रवास करत होता. यावेळी पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे ट्रकच्या पुढे जाणाऱ्या प्रवासी आराम बस चालकाने अचानक वेग कमी केला. यामुळे ट्रक चालकाने वाहन दुसऱ्या मार्गिकेवर घेण्याचा प्रयत्न करत असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने ट्रकला धडक दिल्याची माहिती चालकाने दिली. यामुळे ट्रकचा तोल जाऊन चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटल्याची माहिती चालकाने दिली. सुदैवाने ट्रक पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठा अपघात टळला. अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग गस्ती पथक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक मदत केली. रात्री अपघातग्रस्त वाहनाच्या पाठीमागे इतर वाहनांसाठी बॅरिकेड्स लावून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या.

Exit mobile version