बेकायदेशीर खैर लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त;महाड वनविभागाची कारवाई

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील राजेवाडी गावाजवळ महाड वन विभागाने एक संशयीत रित्या जाणार्‍या ट्रकची तपासणी केली असता त्या ट्रकमधून बेकायदेशीर खैर लाकडाची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. हा ट्रक गुजरातवरुन सावर्डे ता.चिपळूण येथे जात असताना वन विभागाने ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रक चालकाकडे अधिक चौकशी करण्यात आल्यानंतर विना परवाना लाकडांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असल्याचे महाड वनविभागाचे अधिकारी राकेश शाहू यांनी सांगितले.

महाड येथील वन विभागाचे अधिकारी राकेश शाहू यांना मिळालेल्या माहिती वरुन रविवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गा वरुन विना परवाना खैर लाकडे भरलेला ट्रक जाणार असल्याचे समजले होते. या माहितीच्या आधारे राकेश शाहू यांनी मुंबई गोवा महामार्गावरील राजेवाडी फाटा येथे वन विभागाच्या कर्मचार्‍यांसहित सापळा रचला होता. त्यावेळी अनेक वाहने जात येत होती.रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला डी.एन.09-एन 9345 हा ट्रक जात असताना त्याला अडविण्यात आले.

ट्रक चालकाची चौकशी आणि ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये विना परवाना खैर लाकुड असल्याचे आढळून आले.चालकाकडे अधिक चौकशी केल्या नंतर सदरचा ट्रक हा सिल्वासा ते चिपळून तालुक्यांतील सावर्डे येथे जात असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी ट्रक चालक मालक शांताराम खंडू पाटील राहाणार सिल्वासा गुजराथ याला ताब्यात घेण्यात आले आहे. वन विभागाने ट्रक मध्ये असलेले 395 खैर लाकडाचे मोठे तुकडे त्याचबरोबर 5 लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला असून खैर लाकडाची विना परवाना वाहतुक केल्याप्रकरणी चालक पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version