स्वतःची पापे लपविण्यासाठीच आघाडीवर खापर फोडण्याचा प्रयत्न

शशिकांत मोदी यांचा टोला
भाजपनेत्यांना आत्मपरीक्षणाची सूचना
। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूणमधील विकासकामांसंदर्भात स्वतःची पापे लपविण्यासाठीच राज्यशासनात सत्तेवर असणार्‍या महाविकास आघाडीवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा टोला चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा शिवसेना नेते शशिकांत मोदी यांनी लगावला आहे. हा टोला लगावतानाच, भाजप नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची सूचनाही त्यांनी केली.
राज्यविधिमंडळाच्या मागील निवडणुकांपासून सेनाभाजप यांच्यात निर्माण झालेले वैर दिवसागणिक वाढताना आढळत आहे. उभयतांमध्ये निर्माण झालेल्या या वैमनस्यामुळे राज्यातील प्रत्येक ठिकाणी राजकीय तापमान उच्चांक गाठत असून, राजकीय वतुर्ळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे काम सातत्याने सुरू आहे. एकेकाळी परस्पर सहचार्याने काम पाहणारे हे पक्ष आपापसातील मतभेद आणि ठेवणीतील सारेच चव्हाट्यावर मांडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही हेच चित्र वारंवार समोर येत आहे.
यातच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासंदर्भात भाजपला लक्ष्य करून, चिपळूणचे शिवसेना नगरसेवक शशिकांत मोदी यांनी भाजप नगरसेवक विजय चितळे यांना खडे बोल सुनावले आहेत. हे करताना नगरपालिकेतील भाजप सत्ताधार्‍यांवर कमालीचे आरोप शशिकांत मोदी यांच्याकडून करण्यात आले आहेत.
शशिकांत मोदी म्हणाले आहेत की, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाची तारीख दोन वर्षापूर्वी ठरत असताना उदघाटन होवू शकले नाही. हे उद्घाटन झाले असते, तर कोण कोण अडचणीत आले असते? मंजुरीशिवाय केलेल्या कामाची जबाबदारी कोणी घेतली असती? आणि म्हणूनच भाजपच्या चुकीच्या काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अजूनही मृताअवस्थेत असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले आहे.
याचप्रमाणे, पुरानंतर सांस्कृतिक केंद्राचे योग्य प्रकारे ऑडिट होवून आणि तसा खरा अहवाल सभागृहासमोर आला असता, तर पुन्हा अहवाल आणण्यासाठी ठराव करण्याची गरज लागली नसल्याचे मत व्यक्त करत, भाजी मंडई, मटण मार्केट, महिला क्रीडा संकुल, भुयारी गटार योजना व पूरपरिस्थितीतून चिपळूणला सावरण्यासाठी करावयाचे प्रयत्न प्रकल्प अद्यापही सत्ता असूनही सुरु करता आले नाहीत. करोडो रुपये खर्च करून तयार केलेले चिपळूणातील विविध भागातील डांबरीकरणाचे रस्ते खड्डेमय झालेले आहेत. आणि हे पाप लपविण्यासाठी नगरसेवक विजय चितळे यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे खापर शिवसेना प्रणीत महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शशिकांत मोदी यांनी केला आहे.
याशिवाय, जनता सर्वांना ओळखून आहे. चिपळूण शहराचा विकास कोणामुळे थांबला व झालेला विकास दर्जेदार का होवू शकला नाही याचे आत्मपरीक्षण नगरसेवक चितळे यांनी करावे, असा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी जुळणारे नाव आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार हे रामतीर्थ तलाव ते मुरादपूर तीठा नवीन रस्ता या रस्त्याला देण्यात आले आहे. आणि योग्य विषय विषयपत्रिकेवर असेल, तर शिवसेना का जाणीवपूर्वक विरोध करत नाही हे आम्ही याआधीही वारंवार दाखवून दिलेले असल्याचेही शशिकांत मोदी यांनी सांगितले आहे.

Exit mobile version