। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील जांभुळ गावचे माजी सरपंच तथा म्हसळा तालुका रायगड जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन तुकाराम महादू महाडीक यांचे बुधवारी (दि.2) निधन झाले. निधनासमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुन, जावई नातवंड आणि आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
तुकाराम महाडीक हे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे खंदे समर्थक होते. महाडिक यांनी जांभुळ ग्रामपंचायतीचे सातत्याने 25 वर्षे सरपंचपदावर लोकप्रतिनिधित्व केले होते. म्हसळा तालुक्यात शेकापचा महाडीक यांनी गड अभ्यद्य राखल्याने त्यांना जयंत पाटील यांनी रायगड जिल्हा बँकेवर संचालक मंडळात 5 वर्षे काम करण्याची संधी दिली होती. तुकाराम महाडीक हे राजकीय क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात विविध सामाजिक संघटनेत सक्रिय काम केले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच जिल्हाभरातून अनेक सामाजिक, राजकिय, मित्र परिवार आणि शासकीय मान्यवर पदाधिकारी यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.