नेरळमध्ये नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सक्षम ग्रामपंचायत समजल्या जाणार्‍या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे? असा प्रश्‍न नेरळमधील रहिवाशांना पडला असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतमधील नळपाणी योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र बंद असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना कार्यकर्ते अंकुश दाभने यांनी केला आहे, त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

नेरळ ग्रामपंचायत भागात नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनेमध्ये जलशुध्दीकरण केंद्रामुळे नेरळ गावातील पाणी हे शुद्ध समजले जाते. पण, नेरळ गावात आज 21 जून रोजी नळाद्वारे आलेले पाणी पाहून सर्व ग्रामस्थांना धक्का बसला. काल दिवसभर पाऊस असल्याने सकाळी पाणी काहीसे गढूळ येणार अशी अपेक्षा होती, मात्र आज नळाला आलेले पाणी हे पूर्णपणे गढूळ पाणी होते. कोणत्याही घरात आज नळाला गढूळ पाण्याशिवाय कुठेही स्वच्छ पाणी नव्हते. त्यामुळे सर्व बहुसंख्य ग्रामस्थांनी आपल्या घरी आलेल्या पाण्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. ग्रामपंचायतीमधील कारभाराबद्दल नेरळ गावातील ग्रामस्थांच्या संतप्त भावना मिळत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली.

शिवसेनेचे तालुका सचिव असलेले अंकुश दाभने यांनी थेट नेरळ ग्रामपंचायतीचे जलशुध्दीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना धक्का बसला असून, नेरळ ग्रामपंचायत हे जलशुध्दीकरण केंद्र नावापुरते सुरू होते. तेथे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे आलम हे रसायन गेल्या दोन महिन्यांपासून संपले असल्याची माहिती कामगारांनी दिली.त्या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांनी आलम संपले असल्याचे पत्र एक महिन्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीकडे दिले आहे. तेथे टीसीएल उपलब्ध असून, पाणी शुद्ध करणारे पंखेदेखील बंद आहेत. तर, पाणीपुरवठा योजनेचे उद्भव विहीर येथे असलेल्या पंप हाऊसमधील एक वीज पंप बंद असून, दुसरा पंपदेखील बंद पडल्यास मोठी पाणी कोंडी नेरळ ग्रामस्थांची होऊ शकते.

ग्रामपंचायतीने अशा घाणेरड्या पाणीपुरवठ्याबाबत तात्काळ सार्वजनिक खुलासा करावा अन्यथा याबाबत जनआक्रोश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुबा नजे, ग्रामस्थ


आम्ही आलमची मागणी काही दिवस आधी केली आहे, मात्र त्याचा साठा उपलब्ध झाला नाही. जलशुध्दीकरण केंद्र सुरू आहे. टीसीएल पावडर दररोज पाण्यात टाकली जात असून, त्याद्वारे पाणी शुद्ध करून सोडले जाते. मात्र, पावसाळा असल्याने पाणी शुद्ध करणार्‍या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अरुण कार्ले, ग्रामविकास अधिकारी
Exit mobile version