| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली शहर नेहमीच समस्यांच्या गर्तेत अडकून पडले आहे. पाली शहरात होणारी अवैध वाहतूक बंद करावी. शहरातील हटाळेश्वर तलाव येथील कचरा व्यवस्थापन करावे यासाठी मनसेने पाली नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरूणकर व पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांना नुकतेच निवेदन दिले आहे. यावर लवकर उपाययोजना केली नाही तर मनसे स्टाईलने जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून मनसे पाली शहर अध्यक्ष दीपेश लहाने व पदाधिकार्यांनी दिला आहे.
पाली शहरात वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अवैध वाहतुकही नागरिकांसाठी डोकेदुखी बनत असून या अवैध वाहतुकीमुळे पालीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून रस्त्या लगत असणार्या दुकाने व घरांना या धुळीला सामोरे जावे लागत आहे. धुळीचा हकनाक त्रास सहन करावा लागत असून धुळीमुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाली शहरातील अवैध वाहतूक लवकर बंद करावी. तसेच हटाळेश्वर मंदिराजवळील हटाळेश्वर तळावाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा व कत्तल केलेल्या प्राण्यांचा कचरा व सांडपाणी तलावात सोडत असल्याने, तलाव परिसरातील कचरा व सांडपाणी यांचे व्यवस्थापन करण्यात यावे व संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल त्याला सर्वस्वी पाली नगरपंचायत व स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा मनसे सैनिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देतेवेळी मनविसे सुधागड तालुका अध्यक्ष भावेश बेलोसे, मनविसे सुधागड तालुका सचिव तेजस परबळकर, मनविसे पाली शहर सचिव प्रतिक आंग्रे, मनविसे पाली शहर अध्यक्ष अजिंक्य पाशीलकर, जांभुळपाडा विभाग अध्यक्ष शेखर चव्हाण, नाडसुर विभाग अध्यक्ष संकेत वरगडे, सुरज परबलकर आदीसह मनसे सैनिक उपस्थित होते.






