एसटी चालू करा

म्हसळा तहसील कार्यालयावर कुणबी समाजाचा मोर्चा
। म्हसळा । वार्ताहर ।
गेल्या अनेक महिन्यापासून एस.टी संप सुरू आहे. संपामुळे गोर गरीब जनतेला तसेच विद्यार्थ्यांना प्रवासाअभावी खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अनेक वेळा विविध संघटनेने एसटी चालू करण्याबाबत विनंती करूनही अद्याप एसटी सुरु केली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांना विद्यार्थी, ज्येेष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, आणि सर्वसाधारण नागरिक यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून म्हसळा तालुका कुणबी समाजाने मोर्चा काढून शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेचे मोर्च्याच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

बुधवार दि.02 मार्च, 2022 रोजी म्हसळा एसटी. स्टॅन्ड ते तहसिल कार्यालय या ठिकाणी शांततापूर्ण व नियमांचे पालन करून निदर्शने व मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदन देण्यात आले. तालुक्यातील 84 गावामध्ये लोकांची दळणवळण प्रक्रिया करण्यास जनतेला प्रवासासाठी त्रास होत आहे. तालुक्यातील बहुजन समजाच्या कामासाठी आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तसेच आरोग्य बाजारहाट अशा करणांसाठी होणारी गैरसोय दूर व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी कुणबी समाज अध्यक्ष महादेव पाटील, गणेश बोर्ले, बबन मनवे, छाया म्हात्रे, अंकुश खडस, लक्ष्मण भाये, रामचंद्र बोर्ले, राजाराम तिलटकर, सतिश शिगवण, टिंगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version