आता न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष
| दिघी | वार्ताहर |
राज्यभर एसटी कर्मचार्यांचा विलीनीकरण होण्यासाठी आपला लढा सुरूच आहे. त्यासोबतच श्रीवर्धन आगारातील या संपाला आता जवळपास 5 महिने पूर्ण होत आहेत. यामध्ये शहरामागोमाग गावाकडील अनेकांचा प्रवास रोखला आहे. मात्र, येथील कर्मचारी एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या बाबत न्यायालयीन निर्णयाची वाट पहात आहेत. राज्यव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी श्रीवर्धन येथील कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन करण्यास सुरुवात केली. एसटी महामंडळाचे राज्यसरकार मध्येच विलीनीकरण करा या मुख्य मागणीसाठी येथील संपकरी ठाम आहेत. संपामुळे श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह मुंबई, पुणे अन्य शहरांकडे जाणार्या अनेकांचा प्रवास सध्या बुडाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत होऊन येथील गावागावात मिळणारा एसटी प्रवास सुरु करण्यात यावे. अशी मागणी प्रवाशांकडून होत असताना राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य असल्याचा अहवाल दिल्यानंतर सरकारने त्यानुसार भूमिका स्पष्ट केली. मात्र, न्यायालयात संपाप्रकरणी सुनावणी होणार असल्याने ठोस निर्णय होणार, या प्रश्नाच्या उत्तरासाठी एसटीतील संपकर्यांसह तालुक्यातील तमाम प्रवाशांच्या नजरा न्यायालयाकडे लागल्या आहेत.
सुरुवातीला संपात सहभागी
ऑक्टोबर मध्ये एसटी कर्मचार्यांनी सुरू केलेल्या संपात एकूण 253 पैकी 245 कर्मचार्यांनी स्पष्ट सहभाग नोंदविला. महिन्याभरात संपकरांची आकडेवारी कमी होताना 7 ते 8 अशी कमी होत गेली. सद्यःस्थितीत 155 कर्मचारी या संपात लढा देत आहेत.
गेली पाच महिने आमचा लढा सुरू आहे. आमचे आंदोलन नसून आम्ही दुखवटा पाळत आहोत. कारण महाराष्ट्रात एसटी विलीनीकरणाच्या लढ्यात सरकारच्या नाकर्तेपणामुळे 112 कर्मचार्यांचे बळी गेलेत. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत हा दुखवटा असाच चालू राहणार, आम्ही माघार घेणार नाही. न्यायालय निर्णय आम्हाला मान्य असेल.
हितेश शिवदे, संपकरी कर्मचारी, श्रीवर्धन