तापमानवाढीमुळे कासव संवर्धन मोहीम अडचणीत

| अलिबाग | वार्ताहर |

तापमानवाढीमुळे माणसांबरोबरच पशुपक्ष्यांचेही हाल होत असून, काही जीवांच्या अस्तित्वच संकटात आले आहे. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या प्रजातीला तापमानावाढीचा फटका सहन करावा लागत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे.

रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. काही वर्षांपासून वनविभाग आणि कासव मित्रांच्या सहकार्याने कासव संवर्धन कार्यक्रमही सुरू आहे. मात्र, यंदा कासव संवर्धनाला फटका बसला आहे. उष्मा लाटेमुळे कासवांची अंडी उबवून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. कासवांनी घातलेल्या अंड्यांपैकी फक्त 40 टक्के अंड्यांतून पिल्ले बाहेर पडली, तर 60 टक्के अंडी खराब झाली आहेत. ऑलिव्ह रिडले कासव नोव्हेंबर ते मार्चदरम्यान प्रजननासाठी समुद्रकिनार्‍यावर येतात. कासवांनी अंडी दिल्यानंतर 55 ते 60 दिवसांत पिल्ले बाहेर येतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील दिवेआगर, राजपुरी खाडीकिनारी कासवे मोठ्या संख्येने प्रजननासाठी येतात. पिल्ले अंड्यातून बाहेर पडताच समुद्राकडे धाव घेण्याचा अनुभव विलक्षण असतो. हा क्षण अनुभवण्यासाठी काही पर्यटकही आवर्जून येतात. यंदा हा अनुभव फारसा घेता न आल्याचे कासव संवर्धन मोहिमेत भाग घेणार्‍या निसर्गप्रेमींनी खंत व्यक्त आहे.

उष्मालाटेमुळे राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान 38 ते 44 अंशाच्या पुढे गेले होते. कधी नव्हे ते कोकण किनारापट्टीनेही तापमानाची चाळीशी गाठली. मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या कासव संवर्धन मोहिमेत किनारपट्टीवरील ग्रामस्थही सहभाग घेत आहेत. त्यासाठी वनविभागाशी संपर्क करीत आहेत. यंदा वाढत्या उष्णतेमुळे कासव संवर्धन मोहीम अडचणीत आली आहे.

Exit mobile version