दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
। सोलापूर । वृत्तसंस्था ।
उत्तर सोलापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने चोवीस म्हशींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील गूळवंची गावात गुरुवारी (दि.04) हि दुर्दैवी घटना घडली. गुळवंची गावातील गोपालन आणि दूध उत्पादनाचा व्यवसाय करणाऱ्या हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या म्हशी गुरुवारी सायंकाळी गावाच्या शिवारात चरत होत्या. या म्हशी फिरत फिरत तेथील पाण्याने भरलेल्या ओढ्यात उतरल्या. त्याच ओढ्यात विजेची तार तुटून पडली होती. त्यामुळे म्हशींना विजेचा जबर धक्का बसून ओढ्यातच म्हशींचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विजेचा प्रवाह थांबवला आणि तडफडत असलेल्या चार म्हशींना बाहेर काढण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांनी सोलापूर-बार्शी महामार्गावर रास्ता रोको करून कारवाईची आणि नुकसान भरपाईची मागणी केली.