| पालघर | प्रतिनिधी |
पालघर तालुक्यातील हरणवाडी येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचा भटक्या कुत्र्याच्या नखाच्या जखमेमुळे झालेल्या रेबीज संसर्गाने मृत्यू झाला. या प्रकरणानंतर नागरिकांनी भटक्या, तसेच पाळीव कुत्र्यांचा चावा किंवा नखांद्वारे झालेल्या जखमेवर तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पालघर नगरपरिषद क्षेत्रालगतच्या हरणवाडी येथील पॅरामाऊंट सोसायटीत राहणारी पायल सोनी हेमंत ओके हिला अंदाजे दोन महिन्यांपूर्वी सोसायटीजवळील भटक्या कुत्र्याने नख मारले होते. जखम किरकोळ वाटल्याने तिने ती दुर्लक्षित केली. मात्र, त्यानंतर तिला रेबीजचा संसर्ग झाला व ती गंभीर आजारी पडली. नख लागल्यानंतर आवश्यक प्राथमिक उपचार न झाल्याने तिची प्रकृती बिघडत गेली. वैद्यकीय उपचारादरम्यान लक्षणांवरून डॉक्टरांना रेबीजची शंका आली; मात्र तेव्हा उपचार उशिरा सुरू झाले. अखेर 2 डिसेंबर रोजी पायलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सोसायटी परिसरात कुत्र्यांना अन्न देण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वीस वर्षीय तरुणीचा रेबीजने मृत्यू
