। अहिल्यानगर । प्रतिनिधी ।
पठारभागातील डोंगरांना वणवा लागण्याची मालिका सुरूच आहे. अशातच म्हसवंडी (ता. संगमनेर) येथील ब्राह्मणदरा डोंगराला भीषण आग लागून एका पशुपालकासह दोन जनावरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) दुपारी उघडकीस आली.
म्हसवंडी येथील सीताराम तुकाराम जाधव हे मंगळवारी जनावरे चारण्यासाठी परिसरातील ब्राह्मणदरा डोंगरावर गेले होते. मात्र संध्याकाळ झाली, तरी जाधव घरी न आल्याने त्यांच्या भावासह कुटुंबातील सदस्यांनी परिसरात शोध घेतला. परंतु, डोंगराला भीषण आग लागली होती. यामुळे पुन्हा ते बुधवारी सकाळी शोध घेण्यासाठी डोंगरावर गेले असता सीताराम यांच्यासह दोन जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सीताराम जाधव यांचा मृतदेह घुलेवाडी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.