| पनवेल | वार्ताहर |
अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी उलवे सेक्टर-25 ए भागात शनिवारी सायंकाळी सापळा लावून अटक केली. विरेंद्र सुंदर पुजारी (45) आणि नरेश कुमार बलजीत सिंग (39) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळ सापडलेले 71.3 ग्रॅम वजनाचे 14 लाख 25 हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) व दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उलवे सेक्टर-25 ए येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ दोन व्यक्ती एमडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, प्रकाश पवार, पोलिस उपनिरीक्षक विनोद लभडे व त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी उलवे सेक्टर-25 ए मधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ सापळा लावला होता. त्याठिकाणी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विरेंद्र पुजारी आणि नरेश कुमार हे दोघे संशयास्पदरित्या आले असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता, विरेंद्र पुजारी याच्याजवळ 55.57 ग्रॅम वजनाचे 11 लाख 11 हजारांचे; तर नरेश कुमार याच्याजवळ 15.73 ग्रॅम वजनाचे 3 लाख 14 हजार रुपये किमतीचे एमडी सापडले. त्यामुळे पोलिसांनी 71.3 ग्रॅम वजनाचे 14 लाख 25 हजार रुपये किमतीचे एमडी जप्त केले. त्यांनतर सदरचे अंमली पदार्थ त्यांनी कुठून आणले याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.