| पेण | प्रतिनिधी |
पेणचे उद्योगपती प्रदीप वर्तक आणि त्यांचे सहकारी दत्तात्रेय दांडेकर यांना पेण पोलिसांनी खोट्या सातबाराप्रकरणी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणोली येथील शेत सर्वे नं.223/0 नवीन नवघर 112 हेक्टर.आर. जमिनीवर 70 ब नुसार दावा सुरू असताना सूर्यकांत पोशा यांनी या प्रकरणातील चुकीचे दस्तावेज शोधून काढले. त्यामध्ये प्रदीप वर्तक आणि दत्तात्रेय दांडेकर यांनी खोटे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून मुंबई येथील वामन रामचंद्र माडये यांच्या नावे पानसई-माणगाव येथील सर्वे नं. 198/6 या मिळकतीचे आणि अमोल नारायण कामत यांच्या नावे दासगाव-महाड येथील सर्वे नंबर 130/आ 3 या मिळकतीचे खोटे साताबारे उतारे सापोली-पेण येथील सर्वे नंबर 60/0 या मिळकतीच्या रजिस्टर खरेदी खत नोंदणी करण्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सहकार्य केल्यामुळे पेण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर प्रदीप वर्तक आणि दत्तात्रेय दांडेकर यांना 31 जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच पोलिसांकडून या दोघांना न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत तपासकामी पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सांगण्यात आले आहे.
खोट्या सातबाराप्रकरणी दोघांना अटक
