नेरळ पोलिसांची कामगिरी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील मोबाईल चोरीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र, नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. नेरळ गावातील साई श्रद्धा हॉटेल आणि सेवालाल नगरमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली होती. नेरळ गावातील खांडा भागात असलेल्या सेवालाल नगरमधील अनिल किसन चव्हाण यांच्या राहत्या घरातून 11 डिसेंबर रोजी मोबाईल फोनची चोरी झाली होती. रात्री घरातील खिडकीचे ग्रील काढून एका चोरट्याने त्यांचा खुर्चीत ठेवलेला दहा हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल चोरी केला होता. त्याबाबत अनिल चव्हाण यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने या गुन्ह्यातील आरोपीला पकडून त्याच्याकडून मोबाईल जप्त केला.
नेरळ गावातील बाजारपेठ भागातील साई श्रद्धा हॉटेल चे मालक मुकेश कुमार रामकृष्ण रावत हे 12 डिसेंबर रोजी रात्री आपल्या रूममध्ये झोपले होते. त्यावेळी हॉटेलच्या अर्धे उघडे असलेल्या शटरमधून घुसून त्या चोरट्याने रावत यांचे तब्बल चार मोबाईल फोन हे तेथून उचलून त्यांची चोरी केली. सॅमसंग, रेडिमी, ओपो आणि टेक्नो या कंपन्यांचे साधारण 25 हजार रुपये किमतीचे मोबाईलची चोरी केली. मोबाईल चोरी करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या मोबाईल चोराला पकडल्याने नेरळ पोलिसांचे कौतुक होत आहे.