। पुणे । प्रतिनिधी ।
मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव परिसरात फिरायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना रविवारी घडली असून हे दोन तरुण फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत होते. या घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले. मात्र, त्या दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.
फर्ग्युसन महावि्द्यालयात पदव्युत्तर पदवी (एम.एससी इलेक्ट्राॅनिक्स) विभागातील विद्यार्थी ओजस आनंद कठापुरकर (22), राज संभाजी पाटील (22) आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी असे नऊ जण रविवारी (दि. 20) सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून खांबोली तलावाजवळ फिरण्यासाठी आले होते. सर्व मित्र मंडळी पोहण्यासाठी पाण्यात उतरली. त्याचवेळी ओजस आणि राज तलावात साचलेल्या गाळात अडकले. त्यांच्यासोबत असलेले बाकी मित्र पाण्यातून बाहेर पडले. या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली असता पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेत दोघांना बाहेर काढले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्थानिक डाॅक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.







