मालडुंगेत विजेचा शॉक लागून दोन गायींसह बैलाचा मृत्यू

। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।

पनवेल तालुक्यातील मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत तुटून पडलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या धक्क्याने दोन गायी आणि एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 22) रात्री घडली. या घटनेनंतर शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा परिसरातील उच्चदाब वीजवाहिनी अचानक तुटून जमिनीवर कोसळली. याच वेळी जवळ असलेल्या दोन गायी आणि एका बैलाला विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी करत संबंधित यंत्रणांविरोधात नाराजी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम चौधरी, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी मृत जनावरांची पाहणी करून पंचनामा केला.

यावेळी सरपंच सिताराम चौधरी यांनी जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यांची योग्य देखभाल न केल्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून भविष्यात मानवी जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मृत जनावरांच्या मालकांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच परिसरातील धोकादायक वीजवाहिन्या व खांबांची त्वरित तपासणी करून दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Exit mobile version