। अलिबाग । प्रतिनिधी ।
मैफिल, अलिबाग या संस्थेतर्फे येथील आरसीएफ वसाहतीमध्ये 8-9 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विख्यात वहाणे भगिनी यांची सतार- संतूर जुगलबंदी, युवा गायिका कस्तुरी देशपांडे-मांजरेकर हीचे शास्त्रीय गायन आणि अभिजित पोहनकर यांचा लोकप्रिय बॉलीवुड घराना हा फ्यूजन कार्यक्रम अशी भरगच्च सांगीतिक मेजवानी आहे.
मैफिल, अलिबाग ही संस्था आरसीएफच्या सहयोगाने गेली पस्तीस वर्षे दर्जेदार संगीताचे देखणे कार्यक्रम आयोजित करीत आहे. अलिबागसह रोहा, पेण, मुरुड, रेवदंडा तालुक्यापर्यन्त सभासद वर्गाचे क्षेत्र पसरलेल्या या संस्थेने आजवर उस्ताद झाकीर हुसैन, पं शिवकुमार शर्मा, पं हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद शहीद परवेझ, पं उल्हास कशाळकर, उस्ताद डागर बंधू, पं वेंकटेश कुमार, विदुषी प्रभा अत्रे, अश्विनी भिडे यांसारख्या जगदविख्यात बुजुर्ग कलाकारांसह अनेक युवा व स्थानिक कलाकारांचे अभिजात संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या मैफिलच्या परंपरेनुसार या वर्षीच्या 8-9 फेब्रुवारीच्या महोत्सवात पहिल्या दिवशी वाहने भगिनी आणि प्रतिभाशाली उदयोन्मुख गायिका कस्तुरी देशपांडे यांचे सादरीकरण होणार आहे. सध्या भारतीय शास्त्रीय संगीतावर ती पीएचडी करत आहे. या कार्यक्रमात तिला स्वप्नील भिसे तबल्यावर तर संवादिनीवर निनाद जोशी यांची साथ लाभणार आहे.
याच दिवशी वाहणे सिस्टर्स नावाने ओळखल्या जाणार्या प्रकृती आणि संस्कृती या दोन्ही बहिणी शृतिशील उद्धव यांच्या तबलासाथीने सतार-संतूर जुगलबंदी सादर करणार आहेत. संगीत महोत्सवात रविवारी संध्याकाळी अभिजित पोहनकर प्रस्तुत लोकप्रिय कार्यक्रम बॉलिवूड घराना हा कार्यक्रम सादर होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूड गाण्यांचा अनोखा संगम सादर करतो. या कार्यक्रमात अभिजीत पोहनकर यांनी शास्त्रीय संगीताच्या बंदिशी आणि बॉलीवूडच्या हिट गाण्यांना एकत्रित करून एक नवीन ध्वनी निर्माण केला आहे. अभिजीत पोहनकर यांच्या नेतृत्वाखालील बँडमध्ये मुख्य गायिका भाव्या पंडित, शास्त्रीय गायक गंधार देशपांडे, गिटारवादक सौरभ जोशी, बास गिटारवादक राहुल देव, आणि तालवादक केयूर बारवे यांचा समावेश असलेला हा अनोखा कार्यक्रम अलिबागकरांना एक वेगळाच आनंद देऊन जाईल यात शंकाच नाही.
अलिबाग परिसरातील संगीतप्रेमी रसिकांनी मैफिल आयोजित या सांगीतिक मेजवानीला बहुसंख्येने हजर रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.







