भिडे गुरुजींची प्रमुख उपस्थिती; रायगड पोलिसांचा फौजफाटा तैनात
| पोलादपूर | प्रतिनिधी |
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र उमरठ येथून शनिवारी (दि. 8) सकाळी धारातीर्थ गडकोट मोहिमेस प्रारंभ होणार आहे. या मोहिमेसाठी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता भिडे गुरुजी पोलादपुरात दाखल झाले. त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. भिडे गुरुजींच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पितळवाडी येथे शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिला त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आणि धारकरी मावळ्यांच्या शिस्तबद्ध नियोजनात संभाजीराव भिडे गुरुजी उमरठ येथे रवाना झाले. पितळवाडी येथे ढवळी कामथी सावित्री चालक-मालक वाहतूकदार संघटनेकडून संभाजीराव भिडे गुरुजी यांचे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ कुंभार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठान पोलादपूर तालुकाध्यक्ष दीपक उतेकर, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभागप्रमुख संजय मोदी, उबाठा सेना तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, उपसभापती सुमन खेडेकर, सुमन केसरकर, सुमन कुंभार, अर्चना कुंभार, तसेच असंख्य मान्यवर या स्वागतासाठी उपस्थित होते.
शुक्रवारी सायंकाळी उशिरा रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि रोहयो खारलँड व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत उमरठ येथे संभाजीराव भिडे यांची भेट घेऊन पुढील नियोजन व कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत चर्चा करण्यात आली. शनिवारी सकाळी धारातीर्थ मोहिमेसाठी हजारो धारकरी नरवीर तानाजीराव मालुसरे समाधीस्थळी अभिवादन करून श्रीक्षेत्र उमरठ येथून श्रीदेवी तुळजाभवानीची आरती झाल्यानंतर साखर येथे नरवीर सूर्याजीराव मालुसरे समाधीस्थळी तसेच कारगिल शहीद तानाजी बांदल यांच्या समाधीस्थळी धारकरी मंडळींना पुढील मार्गक्रमण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
गडकोट मोहिमेसाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातून तीनशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बाहेरुनदेखील सुरक्षा यंत्रणा मागविण्यात आली आहे.
सोमनाथ घार्गे,
जिल्हा पोलीस अधीक्षक