आता महायुतीचे झेंडेही रुसले

तोकड्या गर्दीत भाजपाचे दोन, राष्ट्रवादीचा फक्त एकच झेंडा

। रायगड । खास प्रतिनिधी ।

अलिबाग येथे सोमवारी पार पडलेल्या प्रचारसभेत महायुतीमध्ये काहीच आलबेल नसल्याचे दिसून आले. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांना पाठींबा देण्यासाठी महायुतीमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हजर राहण्याचे फर्मान त्यांच्या-त्यांच्या पश्रेष्ठींनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात पार पडलेल्या तोकड्यासभेत भाजपाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक झेंडा दिसून आला. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षाचे मनोमिलन झाले नसल्याचे त्यानिमित्ताने अधोरेखित झाले.

अलिबाग-मुरुड विधानसभेच्या निवडणूकी शेकापच्या कणखर आणि तडफदार उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊ ताई यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने आमदार महेद्र दळवी यांना उमेदवारी दिली आहे. दळवी यांना उमेदवारी दिल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम हे नाराज झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपाचा त्यांना छुपा पाठींबा असल्यानेच ते एवढे मोठे धाडस करत असल्याचे आता लपलेले नाही. अलिबाग विधानसभा मतदारसंघात भाजपा निवडणूकीत उरण पॅटर्न राबवणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्यावर होणार असल्याने त्यांच्या तंबूत घबराट पसरली आहे.
महायुतीमधील घटक पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनोमिलन झाल्याचे ठासून सांगण्यात येते. मात्र त्याचे हे सत्य सोमवारी पार पडलेल्या प्रचारसभेत उघडे पडले आहे. दळवी यांच्या तोकड्या सभेत त्यांच्याच पक्षाचे झेंड अधिक संख्येने दिसून आले, तर भाजपाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकच झेंडा दिसून आला.

Exit mobile version