| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरात गिलेन-बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ ऑटोइम्यून आजाराचे दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे आढळल्याने पनवेल महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दोन्ही रुग्णांचा प्रवासाचा इतिहास असून, ते पनवेल महापालिका हद्दीबाहेरील मूळ रहिवासी आहेत. एक तरुण उपचारानंतर घरी परतला असून 71वर्षीय महिलेवर नवीन पनवेलमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन पनवेल महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती सुरू केली आहे.
पहिला तरूण रुग्ण हा चौक येथील रहिवासी असून, तो एप्रिल महिन्यात जर्मनीहून सुट्टीसाठी विचुंबे येथे आला होता. त्यानंतर तो चौकजवळील वावंडळ गावात वास्तव्यास असताना त्याला अशक्तपणा जाणवू लागला. उभे राहणे, चालणे, गिळताना त्रास होणे तसेच दोन्ही पायांमध्ये कमजोरी अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर 6 जून रोजी त्याला नवीन पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर 15 जून रोजी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
दुसऱ्या रुग्ण या 71 वर्षांच्या असून त्या मूळच्या कोकणातील रहिवाशी आहेत. 26 मे रोजी पनवेल येथील तक्का येथील त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या. त्यानंतर त्या 31 मे रोजी चारधाम यात्रेला गेल्या. 12 जून रोजी परतल्यानंतर 14 जूनपासून त्यांना ताप व अशक्तपणा जाणवू लागला. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर 24 जून रोजी हात-पाय सुन्न होऊ लागल्याने त्यांच्यावर नवीन पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले.
पनवेल महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले की, डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा करोनासारख्या संसर्गजन्य आजारांनंतर काही रुग्णांमध्ये गिलेन-बॅरी सिंड्रोम उद्भवू शकतो. या आजारात वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी हात वारंवार स्वच्छ धुवावेत, उकळून व गाळून पाणी प्यावे, शिजवलेले व ताजे अन्नच खावे तसेच उघड्यावर विक्रीस असलेले अन्न टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच दोन्ही रुग्णांचा प्रवासाचा इतिहास लक्षात घेऊन महापालिकेकडून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पनवेलमध्ये ‘जीबीएस’चे दोन रूग्ण आढळले; आरोग्य यंत्रणा सतर्क
