। पनवेल । दीपक घरत ।
पनवेल पालिका हद्दीत डेंग्यूने शिरकाव केला आहे. खांदा वसाहतीमधील एकाच रहिवासी इमारतीत डेंग्यूचे पाच रुग्ण सापडले आहेत. पालिकेची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा मात्र या प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळत आहे. पालिका हद्दीतील खांदा वसाहत येथील सेक्टर 11 मधील भूखंड क्रमांक 22 वर रिगलीया हि 176 सदनिका असलेली इमारत आहे. या इमारतीत डेंग्यूचा फैलाव झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
साथीच्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलणे अपेक्षित असते. पालिका प्रशासनाकडून देखील अशा पद्धतीची पावले उचलण्यात येत आहेत. डेंग्यू, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होऊ नये, याकरीता आरोग्य यंत्रणेमार्फत डासांच्या अळ्यांची पैदास होण्याची शक्यता असलेल्या भागात धूरफवारणी, औषध फवारणी करण्यात येत आहे. पालिकेकडून करण्यात येत असलेल्या या प्रयत्नानंतरही पालिका हद्दीत डेग्ंयुचे रुग्ण आढळून येत असल्याने सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महिनाभरात 11 डेंग्यूचे रुग्ण
पनवेल पालिका हद्दीत महिनाभरात 11 डेंग्यूचे रुग्ण सापडले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ.रेहाना मुजावर यांनी दिली आहे. खांदा वसाहतीमधील रुग्णांची माहिती मिळताच इमारतीमध्ये अळ्यांची पैदास होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणचा शोध घेऊन औषध फवारणी करण्याच्या सूचना संबंधित कर्मचार्यांना करण्यात आल्या आहेत.
खासगी रुग्णालयात एखादा रुग्ण उपचारासाठी आला असल्यास त्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. साथीचे आजार पसरू नये, याकरीता आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
_ डॉ रेहाना मुजावर, एारोग्य अधिकारी