सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरातील कुंभारआळी परिसरात व संत आळी नवी वसाहत परिसरात घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 3 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
पेण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, ही चोरी 1 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 1.30 ते सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान कुंभारआळी व संत आळी पेण येथे घडली. याप्रकरणी सुबोध दत्तात्रय पाटील आणि राजेश रमेश म्हात्रे यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉकही फोडून त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरट्यांनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (किंमत 30 हजार रुपये), 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (15 हजार रुपये), 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले (15 हजार रुपये), 2 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (6 हजार रुपये), 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान (6 हजार रुपये) तसेच 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत 3 लाख 22 हजार रुपये असल्याचे नोंदविण्यात आले आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण हे अधिकचा तपास करत आहेत. पेण शहरात घरफोडीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.






