महामार्ग काँक्रिटीकणासाठी अडीचशे कोटी

नितीन गडकरी, सुनील तटकरे यांच्यात बैठक
अलिबाग | अतुल गुळवणी |
गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता लवकरच मार्गी लागणार असून, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील महार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी अडीचशे कोटी रुपये देण्याचे मान्य केल्याचे खा. सुनील तटकरे यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.
विविध कारणांमुळे रखडलेल्या या महामार्गाबाबत सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे हा महामार्ग पूर्ण होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये नितीन गडकरी, शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली होती. त्यामध्ये तटकरे यांनी काँक्रिटीकरणासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली होती. त्याबाबत मंगळवारी 5 ऑक्टोबरला नवी दिल्लीत केंद्रीय परिवहन मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीला गडकरी आण्ि तटकरे यांच्यासह केंद्रीय परिवहन सचिव उपस्थित होते. त्यामध्ये महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत चर्चा झाली. तटकरे यांनी पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काँक्रिटीकरणासाठी अडीचशे कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली. ती गडकरी यांनी मान्य केल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. लवकरच या कामाबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येऊन महामार्गाच्या कामास गती देण्यास येईल असेही खा. तटकरे यांनी ‘कृषीवल’ला सांगितले.
याबरोबरच मुंबई-गोवा एनएच-66 या मार्गावरील भूसंपादनाच्या समस्येमुळे चौपदरीकरणाच्या कामावर होत असलेल्या परिणामांवर तोडगा काढण्याबाबत, बिरवाडी एमआयडीसीजवळ एनएच-66 साठी अतिरिक्त व्हेंट एरिया प्रदान करण्याबाबत व रायगड रोड राष्ट्रीय महामार्ग एनएच-66 एफ ला ऐतिहासिक मार्ग बनवण्याबाबत चर्चा केली. एनएच-66 वरील कशेडी घाटातील एंट्री पॉईंट आणि एक्झिस्ट पॉईंट येथे सुशोभीकरण स्पॉट प्रदान करण्याची व लोटे चखऊउ जवळील सीएच 194.600 आवाशी गुनाडे येथे व्हीयुपी प्रदान करण्याची मागणी केली.
या भेटी दरम्यान माझ्या मतदारसंघातील नवीन घोषित राष्ट्रीय महामार्गांचे पुनर्वसन आणि श्रेणीकरणाबाबतही चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने एनएच 753 एफ आणि 548-ए यांमधील काही महत्त्वपूर्ण भागांचा समावेश आहे.
याबरोबरच एनएच 753 एफ चा पुणे-पौड-मुळशी-ताम्हणी घाट-माणगाव-म्हसळा- दिघी बंदर हा विभाग आणि 548ए चा पाली फाट्यापासून वाकण फाटा व इंदापूर-तळा-आगरदंडाचा या विभागांचे 95% काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे गडकरी यांना आवर्जून कळवले व त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या या विभागांचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रित केल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.

महामार्ग पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. त्यासाठी केंद्राकडून पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या कामाच्या काँक्रिटीकरणासाठी अडीचशे कोटी मिळणार आहेत. त्यामुळे हे काम लवकरच पूर्ण होईल, असा मला विश्‍वास आहे.
– खा. सुनील तटकरे 

Exit mobile version