उभ्या ट्रेलरला कारची धडक; आजोबांसह 18 महिन्यांच्या नातीचा मृत्यू
| पनवेल | प्रतिनिधी |
भाऊबीज साजरी करण्यासाठी मुंबईला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. पनवेलजवळील नांदगाव येथे रस्त्यावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रेलरला स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजोबा अरुण मारुती ढावरे (65) आणि त्यांची अवघ्या 18 महिन्यांची नात रेखा प्रदीप बनसोडे यांचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील अन्य चार जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंढरपूर आणि सांगोला येथील ढावरे व बनसोडे कुटुंबातील सदस्य भाऊबीज साजरी करण्यासाठी स्विफ्ट डिझायर कारने मुंबईतील कुर्ला येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे जात होते. पळस्पे-जेएनपीटी मार्गावरील नांदगावजवळ जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर एमएच 46 बीव्ही 4618 क्रमांकाचा ट्रेलर बंद अवस्थेत उभा होता. ट्रेलरच्या मागील बाजूस पुरेसे इशारादर्शक फलक किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने मोटारचालकाला त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव कार थेट ट्रेलरवर आदळून त्याच्या खाली घुसली.
या भीषण धडकेत अरुण मारुती ढावरे आणि चिमुकली रेखा बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप गौतम बनसोडे (40), दीपिका प्रदीप बनसोडे (30), वेदिका प्रदीप बनसोडे (12) आणि ज्योत्सना अरुण ढावरे (58) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ, पोलीस उपनिरीक्षक सुशांत दुबे, हजरत पठाण आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघातग्रस्त ट्रेलर नवकार रोड लाईन्स कंपनीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, अपघातानंतर जखमींना मदत न करता आणि पोलिसांना माहिती न देता ट्रेलरचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी ट्रेलरचालकाविरुद्ध दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
