बिअर शॉपी फोडून दोन लाखांची रोकड लंपास

| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यातील विळे गावातील गावठाण बाजारपेठ येथील बंद बिअर शॉपी व देशी दारूचे दुकान फोडून अज्ञात चोट्याने दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. सदरची घटना दि. 12 ते दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9.15 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची फिर्याद महेश मनोहर राजिवडे (40) रा. विळे गावठाण, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महेश मनोहर राजिवडे यांच्या विळे गावठाण बाजारपेठ येथील बंद बिअर शॉपी व देशी दारूच्या दुकानातील पूर्व बाजूकडील भिंतीला असलेला लोखंडी ग्रील अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी अज्ञात हत्याराने उपकून स्लायडिंगच्या खिडकीतून दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील दोन लाख रुपये चोरून तो पसार झाला आहे. या गुन्ह्याची माहिती समजताच माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुले, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. भोजकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. भोजकर करीत आहेत.

Exit mobile version