| पनवेल | वार्ताहर |
बँकेतून पैसे काढून घरी जात असताना, एका ठिकाणी थांबलेल्या व्यक्तीच्या मोटरसाकलच्या डीकीतून अज्ञात चोरट्याने ती रक्कम लंपास केली आहे. ही घटना पनवेल शहरातील उरण नाका रोडवर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र जितेकर यांनी घर कामासाठी 2 लाख रुपये रक्कम बँकेतून काढली होती. काढलेले पैसे त्यांनी रेनकोटमध्ये गुंडाळून मोटारसायकलच्या डिकीत ठेवले होते. घरी जात असताना उरण नाका रोडवर गाडी एका ठिकाणी उभी करून ते इतरत्र गेले. मात्र, गाडीची चावी काढायचे विसरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ गाडीजवळ धाव घेतली. परंतु, त्यांना गाडीची चावी मिळून आली नाही. तसेच, गाडीची डिकी उघडलेल्या अवस्थेत आढळली आणि रेनकोटमध्ये गुंडाळून ठेवलेली रक्कम देखील चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबात त्यांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.







