प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: अलिबागमधील डेअरीतून दोन मुख्य मारेकरी अटकेत

गोळीबार करणारा निखिल यादव, तर कोयत्याने हल्ला करणारा नितेश पवार पोलिसांच्या ताब्यात

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मानपाडा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले आहे. हत्येनंतर फरार झालेल्या दोन मुख्य आरोपींना अलिबागमधील एका डेअरीतून पोलिसांनी अटक केली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार ऊर्फ भावड्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रदीप पूर्णेकर यांच्यावर 29 सप्टेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रानेही हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखेने अनेक पथके तैनात केली होती.

पोलिसांनी यापूर्वी पप्या शिंदे याला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील काही व्यक्तींकडे चौकशी केल्यानंतर आरोपी अलिबागमधील परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका डेअरीवर छापा टाकून निखिल यादव आणि नितेश पवार यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, निखिल यादव याने पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला, तर नितेश पवार याने धारदार शस्त्राने हल्ला केला, असा तपासातील दावा आहे.
या प्रकरणात प्रत्यक्ष हत्येत सहभागी असलेल्या पाच आरोपींचा तपास सुरू असून, पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार हे तिघे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.

अलिबाग कनेक्शनमुळे या प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण आले आहे.

Exit mobile version