मुंबईचे दोन पर्यटक उत्तराखंडमध्ये मृतावस्थेत

। देहरादून । वृत्तसंस्था ।
उत्तराखंडमध्ये बर्फाखाली गाडले जाऊन दोन मुंबईकर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गढवालमधील चमोली जिल्ह्यातील औलीजवळील बर्फाच्छादित कुरणात शनिवारी दोन पर्यटक मृतावस्थेत आढळले. 50 वर्षीय संजीव गुप्ता आणि 35 वर्षीय सिन्शा गुप्ता यांचे मृतदेह सापडले असून दोघांचाही गोठून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सध्या तिथे तापमान शून्यापेक्षा कमी आहे. त्यांचे मृतदेह एका कुरणातील बर्फाळ भागात मोकळ्या जागेत आढळले होते. रस्ता हरवल्यामुळे दोघं कुरणात थांबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तिथे मृतावस्थेत पडल्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांच्या खिशात सापडलेल्या विमान तिकिटांच्या आधारे मृतदेहांची ओळख पटली. प्राथमिक तपासात दोघांच्या विमानाच्या तपशीलावरुन ते मुंबईचे रहिवासी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांचे मृतदेह तिथे किती काळापासून होते आणि दोघांमध्ये काय नाते होते, हे अद्याप अस्पष्ट असल्याचं चमोलीच्या एसपी श्‍वेता चौबे यांनी सांगितले. एका पर्यटकाने दोन मृतदेहांविषयी माहिती दिल्यानंतर, राज्य आपत्ती दल आणि चमोली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह बर्फाखालून बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहितीही एसपींनी दिली.

Exit mobile version