पुलावरून जीप कोसळून दोघांचा मृत्यू

| नांदेड | वृत्तसंस्था |

गोदावरी नदीवरील येळी महाटी पुलावर क्रुझर जीपचे टायर फुटल्याने जीप पुलावरुन गोदावरी नदीत कोसळली. या भीषण अपघातात जीपमधील दोन जण ठार झाले आहेत. या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

लोहा तालुक्यातील येळी येथील उद्धव खानसोळे यांचा मित्र बबलू मारोती ढगे याला भेटण्यासाठी क्रुझर (एमएच 26 बीक्यू 2061) जीप घेऊन येळी येथे दुपारी आला होता. दुपारी चार वाजता आपल्या मित्रांसोबत जेवण करुन ते दोघे येळी येथून मुदखेडच्या दिशेने जात होते. यावेळी येळी महाटी पुलावरुन भरधाव वेगाने जात असताना जीपचे टायर फुटल्याने जीप पुलावरुन गोदावरी नदी पात्राच्या 30 ते 35 फूट खोल पाण्यात कोसळली. या भीषण अपघातात जीपमधील दोघांचाही मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी असलेल्या गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने शेकडो नागरिक जमा झाले. त्यापैकी गावातील काही नागरिकांनी नांदेड येथील अग्निशमन दलाला फोन करुन बोलावून घेतले. घटनेची माहिती मिळताच उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, बीट जमादार निळकंठ श्रीमंगले, पवार तेथे उपस्थित झाले. गावकऱ्यांनी बोटीच्या मदतीने दोन्ही मृतदेह गोदावरी पात्रातून बाहेर काढले. घटनास्थळ हे मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version