। मणिपूर । वृत्तसंथा ।
मणिपूरमधून जुलै महिन्यात बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहे. अद्याप या दोघांचा मृतदेह आढळून आला नाही. या घटनेने मणिपूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तेथील सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. दोन्ही विद्यार्थी मैतेई समुदायाचे आहेत. एकाचे नाव हिजाम लिनथोइंगबी, तर दुसऱ्याचे नाव फिजाम हेमजीत असे आहे.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल, नागरिकांनी तपासयंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेनसिंग यांनी केले आहे. याआधी मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. आता या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृतदेहांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शस्त्रधारी व्यक्तीही दिसत आहेत.