। विजयनगर । वृत्तसंस्था ।
आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये दोन रेल्वे गाड्यांमध्ये धडक झाली आहे. एक पॅसेंजर ट्रेन उभी होती त्याचवेळी मागून आलेल्या दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या धडकेत तीन बोगी रुळावरून घसरल्या. दुर्घटनेत आतापर्यंत या भीषण रेल्वे अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यासोबतच या दुर्घटनेत 100 जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन (08504) विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन (08532) कोथवलसा ‘मंडल’ येथे कंटकपल्लीच्या टक्करानंतर रुळावरून घसरली. या घटनेबाबत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आणि विजयनगरमजवळील जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमकं काय घडलं? विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन ओव्हरहेड केबल कट झाल्यामुळे उभी होती. त्याचवेळी विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन त्याच रुळावर मागून येऊन धडकली. या धडकेनंतर पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. ही धडक इतकी जोरदार होती की एका बोगीचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला देण्यात आली आहे. अपघात निवारण गाडीही घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात नेण्यात येत आहे, अशी माहिती या घटनेबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली आहे. तसेच पीएमएनआरएफ कडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.