। रेवदंडा । प्रतिनिधी ।
पत्नीला रोहा येथून घरी आणण्यासाठी मोटारसायकलवरून निघालेल्या 32 वर्षीय तरुणाचा समोरून आलेल्या भरधाव बुलेट मोटारसायकलशी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुडकोली गावाच्या हद्दीत अलिबाग-रोहा मार्गावर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत अशोक भगत (32) रा. उमटे, पो. रामराज, ता. अलिबाग हे पत्नीला रोहा येथून घरी आणण्यासाठी मोटारसायकलवरून अलिबाग-रोहा मार्गाने जात होते. सुडकोली परिसरात आले असता रोहा बाजूकडून अलिबागच्या दिशेने येणाऱ्या बुलेट मोटारसायकलने त्यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अनिकेत भगत यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही मोटारसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बुलेटस्वारालाही लहान-मोठ्या दुखापती झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी अमित पोपटराव जाधव (36) रा. फणसापूर, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अशोक चांगू भगत (63) रा. उमटे, पो. रामराज यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हशीलकर करीत आहेत.







