डम्पर-रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल-कळंबोली मार्गावर दुचाकी, रिक्षा आणि डम्परच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मुकुंद सोर्नी असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र संतोष मौर्या हा या अपघातात जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद सोर्नी आणि संतोष मौर्या हे दोघे दुचाकीवरून पनवेल येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना पनवेल-कळंबोली रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा रिक्षाला अपघात झाला. तपासादरम्यान रिक्षाचालकाने अचानक रिक्षा वळवल्यामुळे दुचाकी रिक्षाला धडकल्याचे समोर आले. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या डम्परचे चाक त्याच्यावरून गेल्याने मुकुंद याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात संतोष मौर्या जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी रिक्षाचालकासह डम्परचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version