एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील चरई-सोनारवाडी परिसरातील अवघड वळणावर एसटी बसची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. रविवारी (दि.14) दुपारी झालेल्या या अपघातामुळे एसटी चालकाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. बोरावळे पोलादपूर मार्गावरील एसटी बस चालक दत्तात्रेय दराडे हे बस पोलादपूरच्या दिशेने घेऊन परत येत होते. चरई बाजूकडून घागरकोंड गावाकडे जाणारी मोटारसायकल समोरून येत होती. चरई-सोनारवाडी येथील वळणावर दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने जोरदार धडकली. या अपघातात मोटारसायकलस्वार नारायण खेडेकर हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी महाड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेका. तुषार सुतार व सतीश कदम, काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, भाजप तालुकाध्यक्ष वैभव चांदे तसेच युवा सेनेचे दत्ता मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या प्रकरणाचा तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version