। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर सावळे गावाच्या हद्दीतील धोकादायक वळणावर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. मागच्या बाजूने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अनंता गणपत वाघमारे (वय 30, रा. लाखाचीवाडी, ता. कर्जत) यांचा मृत्यू झाला.
अनंता वाघमारे हे कडाव येथून लाखाचीवाडी येथील आपल्या गावी दुचाकीवरून जात होते. दरम्यान, कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील सावळे हद्दीतील वळणावर आले असता कडाव कशेळेच्या दिशेने जाणाऱ्या कारने मागून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, अनंता हे रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कशेळे चेकपोस्टवरील कर्जत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. अनंता यांच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील उपस्थित डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
अपूर्ण कामाचा फटका
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील सावळे परिसरात रस्त्याच्या अपूर्ण कामकाजामुळे येथील अपघाताची मालिका सुरूच आहे. दरम्यान अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.





