| माथेरान | वार्ताहर |
माथेरान घाटात दोन वाहनांचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात वाहनचालकासह दोन पर्यटक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या वाहनात आणखी पर्यटक महिला ह्या प्रवास करीत होत्या, परंतु त्या या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. पर्यटकाना घेऊन माथेरान येथून नेरळ दिशेला निघालेली इको कार आणि समोरून घाट चढत असलेला पिकआप टेम्पो यामध्ये हा अपघात झाला. जखमींना स्थानिक वाहन चालकांनी नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले.
मुंबई -कांजूर मार्ग येथील राहणाऱ्या सात महिला व त्यांची लहान मुले सोबत असा एक ग्रुप हा माथेरान थंड हवेच्या पर्यटनस्थळी फिरण्यासाठी आला होता. आज रविवार विकेंड असल्याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या महिला घरी मुंबई येथे जाण्यासाठी म्हणून परितच्या प्रवासाला निघाल्या होत्या. माथेरान दस्तुरी नाका येथे या महिला वर्गानी नेरळ माथेरान नेरळ प्रवाशी वाहतूक पुरवणारे दोन वाहन बुक केले होते. दरम्यान इको कार या वाहनातून बसून निघालेले हे पर्यटक कड्यावरचा गणपती दिशेला असणाऱ्या 134 क्रमांकाच्या रस्त्यावर घाट उतरत असताना इको कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून येणाऱ्या मालवाहू पिकअप टेम्पोला धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, इको कार यातील प्रवाशी पर्यटक दोन महिला आणि वाहन चालक असे तिघे जण गंभीर जखमी झाले होते. सारिका विचारे या पर्यटक महिलेच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव होत होता. तर सोनाली सावंत या महिलेच्या हाताच्या खांद्याला मार लागलेला आहे आणि वाहन चालक कैलास उर्फ फायटर विरले हा देखील रक्ताच्या थारोळ्यात होता. जखमींना नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात तात्काळ दाखल केल्याने डॉक्टर यांनी जखमी महिला पर्यटकांवर उपचार करून अधिक उपचारासाठी मुलुंड येथे हलविण्यात आले आहे. सोबतच वाहन चालक कैलास विरले याला ही अधिक उपचारासाठी बदलापूर येथे हलवण्यात आले आहे. वाहनचालकाच्या डोक्याला 11 टाके पडले आहे.