उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांचं मार्गदर्शन
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 1 जुलै 2024 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन प्रमुख फौजदारी कायद्यांची सर्वसामान्य जनतेस माहिती व्हावी या उद्देशाने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवार, दि.7 फेब्रुवारी रोजी नवीन फौजदारी कायद्यांबद्दल जागरूकता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
याबाबत श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी मार्गदर्शन केलं.त्याबरोबरच तुमच्या बाबतीत कोणतीही गुन्हेगारी स्वरूपाची घटना घडत असेल तर त्वरित 112 या नंबरवर कॉल करा. या नंबरवर कॉल केल्यास आम्हाला तुमचं ठिकाण, तुम्हाला कोणती अडचण आहे याबाबत त्वरित माहिती मिळते, त्यामुळे पोलिसांकडून तुम्हाला जलद प्रतिसाद मिळू शकतो. सध्या जे काही सायबर क्राईम घडत आहेत त्याला आपणच सतर्क राहून प्रतिबंध करू शकतो, असं आवाहन केलं.
नवीन कायद्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, इलेक्ट्रॉानिक पुरावे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष याला कायद्याचा भाग बनवल्यामुळे खटले लवकर निकाली काढण्याचा मार्ग सुकर झाला असून तक्रार, समन्स आणि साक्ष या प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केल्यामुळे न्यायाला गती मिळून खटल्यांचा लवकरात लवकर निकाल लागण्यास मदत होणार आहे. त्यामुळे याची माहिती करून घेणे गरजेचं असल्याचं मत दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी व्यक्त केलं.
याप्रसंगी दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस कर्मचारी, विविध मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते. या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल वडवलीचे पोलीस पाटील दिलीप नाक्ति यांनी पोलीस ठाण्याचे हनुमंत शिंदे व उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त केले.