। मुंबई । प्रतिनिधी ।
वसई परिसरात गुरुवारी (दि. 18) मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या मुलाचा जीव गेला. ही घटना प्रशासनाच्या वाहतूक नियोजनातील हलगर्जीपणामुळे घडल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रियान शेख (वय २)वसईच्या पेल्हार परिसरात राहत होता. तो गुरुवारी दुपारी एका अपघातात चौथ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तातडीने त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. रियानचा जीव वाचवण्यासाठी दुपारी सुमारे 2.30 वाजता रुग्णवाहिकेद्वारे मुंबईकडे पाठवण्यात आले. मात्र, त्या दिवशी मुंबई–अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकून राहिली आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच रियानची प्रकृती ढासळू लागली. वाहतूक कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नसल्याने अखेर रियानच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्याच ससूनवघर गावातील एका लहान रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
