। नागोठणे । वार्ताहर ।
भारतीय बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्स 2022 या दोन्ही स्पर्धेतील 70 किलोग्रॅम वजनी गटात नागोठण्याजवळील चिकणी (ता.रोहा) गावचा सुपुत्र उदय राजाराम देवरे यांनी दोन सुवर्ण पदक पटकावत सुवर्णमय कामगिरी केली आहे. याबद्दल आयोजकांच्या वतीने त्याचा सुवर्णपदक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उदय देवरे यांनी यापूर्वीही मेन्स क्लासिक महाराष्ट्र श्री 2022 व रायगड श्री 2022 हे किताब मिळविले आहेत.
बालेवाडी पुणे येथे संपन्न या स्पर्धेत 50 ते 100 किलोग्रॅम वजनी गटातील भारतातील विविध राज्यातील बॉडी बिल्डर्सना खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रोहा तालुक्यातील चिकणी येथील उदय देवरे या बॉडी बिल्डर्सने मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्सलच्या 70 किलोग्रॅम वजनी गटात दोन सुवर्ण पदकांना गवसणी घातली. या स्पर्धेसाठी विनायक फिटनेस जिमकडून उदय देवरे याची सर्वोत्तम तयारी करून घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर्सने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत दोन सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल उदय देवरे याच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धेत उदय देवरेची सुवर्णमय कामगिरी
