उदय सामंत निष्क्रिय पालकमंत्री

शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ यांची टीका

| तळा | वार्ताहर |

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे तळा तालुक्यासाठी निष्क्रिय पालकमंत्री असून, श्रीवर्धन मतदारसंघातील शिवसेना संपविण्याचे काम हे पालकमंत्री सामंत करीत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ यांनी केली आहे. शहरातील शिवसेना कार्यालयात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य लीलाधर खातू, शहर प्रमुख राकेश वडके, युवासेना उपजिल्हा प्रमुख भास्कर गोळे यांसह शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रद्युम्न ठसाळ यांनी सांगितले की, आदिती तटकरे पालकमंत्री असताना तळा तालुक्यात शिवसेनेला निधी मिळत नव्हता, त्यामुळे आम्ही नाराज होतो. परंतु, त्यानंतर काही घडामोडी घडल्या आणि शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्रीपदी विराजमान झाले. यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेला चांगला निधी मिळून पक्षाच्या माध्यमातून कामे होतील व या मतदारसंघात पक्षाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आम्हाला होती. परंतु, उदय सामंत पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी साधी तळा तालुक्याला भेट दिलेली नाही, पदाधिकार्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या नाहीत, आढावा बैठक घेतलेली नाही. तसेच एखाद्या कामासाठी फोन केला तर फोनही उचलत नाहीत. यामुळे पक्षाची पीछेहाट होत असून, वरिष्ठांकडून पाठबळ मिळत नसल्याने आमच्यासारखे पदाधिकारी खचून जात आहेत. राज्याचा मुख्यमंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असतानादेखील विकासकामांसाठी निधी मिळत नसेल, शासकीय कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना जुमानले जात नसेल तर मग सत्तेत असूनही पदाधिकार्‍यांचा काय उपयोग आहे, असा सवाल ठसाळ यांनी उपस्थित केला आहे.

आमदार भरत गोगावले यांनी तळा तालुक्यासाठी काही प्रमाणात निधी दिला आहे. श्रीवर्धन मतदारसंघात आमच्या पक्षाचा आमदार नसल्याने आम्ही पालकमंत्र्यांकडेच आशेने बघतो. मात्र, त्यांना श्रीवर्धन मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांबाबत काहीही देणंघेणं उरलेले नाही. तळा तालुक्यासह श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेना शिंदेगटाची ताकद दिवसेंदिवस संपत चालली असून, त्याला फक्त आणि फक्त पालकमंत्री उदय सामंत हेच कारणीभूत असल्याचा आरोपही शेवटी प्रद्युम्न ठसाळ यांनी केला.

Exit mobile version