उद्धव ठाकरे दोन दिवस रायगडात

घेणार सहा जनसंवाद सभा

| रायगड | खास प्रतिनिधी |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार या कालावधीत ते जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यात सहा ठिकाणी सभा घेणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता पेण येथे, दुपारी 3 वाजता अलिबाग-चौल येथे, तर सायंकाळी 6 वाजता रोह्यात त्यांची जनसंवाद सभा होणार आहे. 2 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता पोलादपूर येथे, 3 वाजता म्हसळा येथे आणि सायंकाळी 6 वाजता माणगाव येथील जनसंवाद सभेत संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम महिन्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते तयारीला लागले आहेत. तालुकानिहाय कार्यकर्ता मेळावे घेऊन त्यांनी संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे.
ठाकरे हे रायगडात येणार असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी आणि आ. महेंद्र थोरवे या तिन्ही शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर रायगड जिल्ह्यात पक्षसंघटना डळमळीत झाली होती. अनेकांनी पक्षाचे शिवबंधन तोडले होते. आमदार पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडले असले, तरी कार्यकर्ते आणि नागरिकांची सहानुभूती आजही ठाकरे यांच्याच बाजून असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात होणाऱ्या सभांमधून ठाकरे अशा गद्दारांना कशा प्रकारे फटकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ठाकरेंच्या येण्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांच्या अंगात ऊर्जा संचारणार असल्याने या सभांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Exit mobile version