। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आपला महासंपर्क अभियान सर्वत्र सुरु केला असून कोकणात त्यांचे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात येत आहे. रविवार दिनांक 10 जुलै रोजी अमित ठाकरे यांचे सकाळी 9 वाजता मुरुड तालुक्यात आगमन होणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते मुरुड तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर 10 वाजता मुरुड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता रेवदंडा येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता सारखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या स्मारकाला भेट देवून अभिवादन करतील. दुपारी 12.30 वाजता अलिबाग तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर दुपारी 3 वाजता पेण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची पेण येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर सायंकाळी 5 वाजता खोपोलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता कर्जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत.