वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार

परभणीत उद्धव ठाकरेंनी संजय जाधवांना कडाडून सुनावलं

| परभणी | प्रतिनिधी |

परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह राज्यातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पाऊल उचलले असून, ते प्रत्येक बंडखोर खासदाराच्या मतदारसंघात जाऊन जाहीर मेळावे घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी परभणीत शिवसेना निष्ठावंतांचा मोठा मेळावा पार पडला. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

सभेची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “येथे खुर्च्यांवर जे लोक बसले आहेत ते भाड्याने आणलेले नाहीत, तर ते हक्काचे माणसे आहेत. तुझा माज उतरवण्यासाठी एक शब्द पुरेसा आहे… बोलून बोलून किती बोलणार?”

खासदार संजय जाधव यांच्यावर तोफ डागताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जेव्हा मी शेतकऱ्यांसाठी दौरा काढला होता, तेव्हा आमदार राहुल पाटील माझ्यासोबत होते. हा गद्दार मात्र दौऱ्याला नव्हता, कुठेच हा गद्दार दिसला नाही. आता म्हणतो की उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं नाही. हो, माझी चूक झाली! लक्ष दिलं असतं तर तुझ्या भानगडी आधीच कळल्या असत्या.”

ते पुढे म्हणाले, मी येथे विधानसभेसाठी प्रचाराला आलो होतो आणि लोकसभेला सुद्धा आलो होतो. लोकसभेला तो स्टेडियम पूर्ण भरला होता. राहुल पाटील आपल्याला त्याच स्टेडियममध्ये पुन्हा एक सभा घ्यायची आहे. त्याच स्टेडियमवर जिथे त्या गद्दारासाठी सभा घेतली होती. वाघाचं कातडं पांगरलेला हा एक होता. मी दोघांचे हात वरती केले. त्यातला एक हात राहुलने जो पकडला होता तो वरच्या वर अजूनही अभिमानाने आहे आणि दुसरा पळाला. हे विकास करण्यासाठी पळाले, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

पक्षांतर केलेल्या 6 खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी संविधानाचा दाखला दिला. त्यांनी सांगितले की, खासदार फुटत असताना आम्ही लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन आमचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली होती. जर देशात कायद्याचे राज्य असेल तर हे 6 खासदार बाद झालेच पाहिजेत. जर तुम्ही कायदा पाळला नाही, तर लोकसभा अध्यक्ष इतरांना कायदा पाळायला सांगू शकणार नाहीत. आम्ही अधिकार मानतो, कोणाची मर्जी मानणार नाही. कायद्याचे रक्षण करणारे लोकसभा अध्यक्ष आहेत, असा माझा समज आहे. घटनेचे उल्लंघन होऊ देऊ नका, नाहीतर इतिहास तुम्हाला घटना मोडणारे लोकसभा अध्यक्ष म्हणून नोंदवेल, असा इशारा त्यांनी दिला.

Exit mobile version