भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

| अहमदनगर | प्रतिनिधी |

सुमारे वीस ते पंचवीस वर्षे शिवसेना-भाजपची युती होती. मात्र, ही वर्षे अक्षरश: सडली आहेत. तेव्हा हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही भाजपसोबत गेलो. मात्र, नंतर कळाले की, त्यांचे हिंदुत्व वेगळे आहे. भाजपचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे. तर, आमचचे हिंदुत्व सामान्य माणसाची चूल पेटवणारे आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

उद्धव ठाकरे यांचा मंगळवारपासून नगर जिल्हा दौरा सुरू झाला आहे. दुपारी नेवासा तालुक्यात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ठाकरे यांचे नगर जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी जेसीबीतून फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोनईतील जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीने जनसंवाद मेळावा झाला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार शंकराव गडाख, नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, संदेश कार्ले उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींवरही निशाणा
दिल्लीच्या वेशीवर धुमशान चालू आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. ज्यांच्या जोरावर मोदी पंतप्रधान झाले, त्यांच्या घरी जातात मग ते शेतकरी तुमच्या घरी आलेत तर चालत नाही का? पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक पाहिजे. ते दिल्लीत आहेत, त्यांचे आई वडील हे शेतकरी आहेत. त्यांना रोखतात, मोठी भिंत लावतात. खिळे टाकतात. ज्या मातीत सोनं उगवतात, त्याच मातीत शेतकऱ्यांनी सरकारला गाडले पाहिजे, अशी टीका त्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पंतप्रधान मोदींवर केली आहे.
निष्ठावंतांचा अपमान
आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला. हा भाजपलाच धक्का आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अशोक चव्हाणांसारखे उपरे आणून ठेवून निष्ठावंतांचा अपमान केला जातो. अशा भाजपला आगामी निवडणुकीत जनता अजिबात थारा देणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि खासदारकी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीपद द्यायचे हीच मोदी गॅरंटी आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Exit mobile version