| अलिबाग | प्रतिनिधी |
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. एक व दोन फेब्रुवारी असा दोन दिवसीय त्यांचा दौरा असून अलिबागसह सहा ठिकाणी सभेच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शनिवारी (दि.27) दिली. त्यांच्यासमवेत सतीश पाटील, कमलेश खरवले, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर, कृष्णा कडवे, कैलास गजने, रेखा पेडणेकर, स्नेहल देवरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत संवाद साधण्यासाठी या जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. अलिबाग, पेण, रोहा, महाड, माणगाव, म्हसळा याठिकाणी सभा होणार आहेत. जनसंवाद सभेची सुरूवात पेण येथून होणार असून सभेची सांगता महाड येथे होणार आहे. अलिबाग व मुरुड या दोन तालुक्याच्या मध्यभागी चौल परिसरातील पिरांचे देऊळ येथे एक फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सभा होणार आहे.
यावेळी लोकसभेचे उमेदवार अनंत गीते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभेसाठी दहा हजार कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.