माणगाव उपविभागीय अधिकारीपदी उमेश बिरारी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव उपविभागीय अधिकारी (प्रांतअधिकारी) प्रशाली जाधव दिघावकर यांचा कार्यकाल संपल्याने त्याजागी उमेश बिरारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रशाली जाधव यांची नियुक्ती मुंबई येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर केली आहे. उमेश बिरारी यांनी शुक्रवारी (दि.5) पदभाव स्वीकारला.

माणगाव तसेच रोहा तालुक्यात मुंबई- दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरीडोर अंतर्गत दिघी पोर्टसाठी जमीन भूसंपादित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याचबरोबर दिघी-माणगाव दरम्यान रस्त्यासाठी भूसंपादन, मुंबई-गोवा महामार्ग दुपदरीकरणात बाधित शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला, पुनर्वसन आदी कामे गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरु आहेत. शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे बिरारी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देतील का, असा प्रश्‍न बाधितांना पडला आहे.

बिरारी यांनी या पदांची सांभाळली जबाबदारी
उमेश बिरारी हे सन 2001 मध्ये महसूल विभागात रुजू झाले. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चोप्रा, नगर जिल्ह्यातील राहुरी, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी व नाशिक येथे तहसीलदार म्हणून काम पाहिले. तसेच रत्नागिरी व पालघर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. माणगाव येथे येण्यापूर्वी मुंबई पश्‍चिम उपनगरात उपविभागीय अधिकारीपद त्यांनी भूषविले. राहुरी, पालघर येथे सेवेत काम करीत असताना त्यांना सरकारने उत्कृष्ट प्रशासक म्हणून पुरस्कार देऊन गौरविले. त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असून भूसंपादनातील अडचणी व बाधितांचे प्रश्‍न समजून काम करतील, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version