संबंधित विभागाचे अधिकारी निद्रिस्त, बांधकाम मात्र सुरुच
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविल या गावाच्या हद्दीमध्ये गट क्रमांक 57 सातबारा दप्तरी 30 गुंठे जिरायत क्षेत्र म्हणून नोंद असलेल्या क्षेत्रामध्ये सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन आरसीसी बांधकाम राजरोसपणे सुरू आहे. महसूल विभागातर्फे थातुरमातुर दंडात्मक कारवाई करून नोटीस दिली आहे. या क्षेत्रामध्ये मातीचा भरावसुद्धा करण्यात आला आहे. याची रॉयल्टी भरण्यात आली आहे का, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, वनविभागसुद्धा यामध्ये मूग गिळून गप्प बसला आहे, असा स्थानिकांनी आरोप केला आहे. वन विभागाच्या जागेमध्ये श्रीवर्धन नगरपरिषदेला रस्ता बनविण्यासाठी रोखण्यात आल्याचे नुकतेच पाहायला मिळाले होते. सदर मालकी जागेला लागून वन विभागाचा गट क्रमांक 60 सरकारी वनविभागाचा सातबारा दप्तरी नोंद असलेला एकूण क्षेत्र 697 असून, यामध्ये असणारी केतकी व सुरुची लागवडसुद्धा तोडण्यात आल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर आतमध्ये जाण्यासाठी रस्ता करण्यात आला आहे. परंतु, अद्याप याविरोधात कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु, संबंधित बांधकाम मात्र पूर्णतवाकडे जात असल्याचे चित्र आहे. याबाबत संबंधित महसूल विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
अधिकारी कोमात, बांधकाम जोमात
इमारत पूर्णत्वाकडे जात असताना सीआरझेडचे उल्लंघन होऊनसुद्धा शासकीय अधिकारी गप्प का? यामध्येसुद्धा कोणी ङ्गआकाफचा आशीर्वाद तर नाही ना? शासकीय अधिकार्यांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने शासकीय अधिकारी कोमात गेल्याचे बोलले जात आहे. तर, बांधकाम मात्र जोमात चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.