। मुंबई । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट क्रमांक 12 व 13 च्या विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे कोकणातून मुंबईत येणार्या जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसला फटका बसत आहे. कोकणातून मुंबईत येणार्या रेल्वेगाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटीऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सीएसएमटीवरील फलाट क्रमांक 10, 11, 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते. यापैकी फलाट क्रमांक 10 आणि 11 चे विस्तारीकरण झाले असून फलाट क्रमांक 12, 13 चे काम हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण पायाभूत कामे नोव्हेंबर 2024 पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले होते. परंतु, हे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी दादरपर्यंतच धावत आहेत. तर, मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावत आहे. परिणामी, प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना त्यांचे सामान घेऊन, पुन्हा लोकलने किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे सध्या अनेक रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटांवरून 24 डब्यांची रेल्वेगाडी धावू शकेल. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीपर्यंत फलाट विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर रेल्वेगाड्यांची सेवा पूर्वपदावर येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली.
जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसला फटका
सध्या सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे गाडी क्रमांक 12134 मंगळुरू मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. गाडी क्रमांक 22120 मडगाव सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 12052 मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.
फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील फलाट क्रमांक 10 ते 13 च्या विस्तारीकरणासाठी एकूण 62.12 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पाला 2015-16 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या फलाटांची लांबी 305 मीटर ते 385 मीटरपर्यंत वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. सीएसएमटीवरील फलाट क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाचे काम 2 जून 2024 रोजी पूर्ण झाले. या कामामुळे येथून 24 डब्यांच्या रेल्वेगाड्या धावू शकतील. सध्या फलाट क्रमांक 12, 13 चे काम सुरू आहे. फलाट क्रमांक 12 आणि 13 ची लांबी 385 मीटर असून त्याची लांबी 690 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार, फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे काम पूर्ण झाल्यास साधारणपणे 6 ते 8 रेल्वेगाड्यांच्या डब्यांत वाढ होईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.