। मुंबई । प्रतिनिधी ।
पिस्तुल, जिवंत काडतुसे व मेफेड्रोन या अमली पदार्थासह 27 वर्षीय संशयिताला अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. आरोपी अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी गोरेगाव परिसरात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहे.
गोरेगाव येथील राम मंदिर रोड परिसरात एक संशयीत अमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (दि.5) सायंकाळी राम मंदिर रोड परिसरातील अस्मि संकुलाजवळ सापळा रचला. त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीशी साधर्म्य असलेला इसम तेथे आला. त्यानुसार पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 23 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ सापडला. त्याची किंमत चार लाख 60 हजार रुपये आहे. याशिवाय आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसेही सापडली आहेत.
घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे चित्रीकरण करून पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख उजेर नियाज खान अशी असून तो त्याच परिसरात गेल्या काही दिवसांपासून राहत होता. आरोपी अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याच्याकडे जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलचा कोणताही परवाना त्याच्याकडे नसल्यामुळे अमली पदार्थ प्रतिबंधक व भारतीय हत्यार बंदी कयद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस हवालदार अजय कदम यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने अमली पदार्थ व पिस्तुल कोठून आणले, याबाबत पोलीस तपास करत आहेत.